नितीन घोरपडे

तुम्ही औरंगाबादहून पुण्याला कसे येता?

एसटी, खाजगी बस,कार असे वेगळे अशा वेगवेगळ्या प्रकारे लोक येऊ शकतात. पण आमचा मुक्तांगण मित्र नितीन घोरपडे काल सायकलवरून औरंगाबादहुन पुण्याला आला. यासाठी त्याला आठ तास लागले.

२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि २६ जुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन या निमित्ताने त्याने हा प्रवास केला.

काही वर्षापूर्वी व्यसनाधीन असलेल्या नितीनची तब्येत इतकी खराब होती की  तेव्हा त्याचं वजन ४२किलो होतं.

अल्कोहोलिक अनॉनिमस आणि मुक्तांगणचे औरंगाबाद फॉलोअप सेंटर यांच्या मदतीने तो आज अकरा वर्ष व्यसनमुक्त आहे. व्यसनमुक्त झाल्यावर व्यायाम,आहार याकडे लक्ष न दिल्यामुळे वजन ८६ किलो झालं. तब्येतीच्या तक्रारी लहान वयातच सुरू झाल्या.

नंतर मात्र व्यायामाची इतकी गोडी लागली की हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन, लांब पल्ल्याचे सायकलिंग असं करता करता तो मराठवाड्याचा पहिला iron man झाला.

आयर्न मॅन ही एक triathlon इव्हेंट असते. त्यात ३.८km स्विमिंग, १८०km सायकलिंग आणि ४२.२ km रनिंग लागोपाठ करायचे असते. पहिल्या वेळी साडेतेरा व दुसऱ्या वेळी तेरा तासात त्याने हे सर्व पूर्ण केले.

याव्यतिरिक्त खारदुंगला चॅलेंज, १६१ किलोमीटरची नाशिक ते मुंबई सह्याद्री अल्ट्रा, सलग बारा तास ट्रेडमिलवर धावणे असे अनेक उपक्रम त्याने केले आहेत.

सध्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्ण मित्रांसमोर मी त्याची मुलाखत घेतली.

सच्चेपणा,साधेपणा, संयम, स्वयंशिस्त,सराव, सातत्य, सकारात्मकता अशी नितीनची वैशिष्ट्ये त्याच्याशी बोलताना जाणवत होती.

व्यसनाच्या काळात त्याच्या हातून झालेल्या चुका अतिशय प्रामाणिकपणे तो सांगत होता. एवढं सगळं करूनही ‘मी काही कोणी मोठा नाही, हे कोणालाही करायला जमेल’, असे अतिशय साधेपणाने तो सांगत होता.

तेलकट, मसालेदार खाणे त्याने पूर्ण बंद केले. आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार तो आहार घेतो. रोज पहाटे उठून सराव करतो. हे सगळं स्वतःचा व्यवसाय सांभाळून करतो. कुटुंबाला वेळ देतो.  केवळ संयम आणि स्वयंशिस्त यामुळेच हे जमू शकते.

स्वतःच्या अपयशामुळे तो खचुन गेला नाही तर त्यातून त्याने शिकायचा प्रयत्न केला.

एखाद्या गोष्टीत वहावत जाण्याचा  व्यसनी माणसाचा स्वभाव असतो. या स्वभावाचा त्याने नियमित सराव करणे आणि त्यात सातत्य राखणे यासाठी सकारात्मक उपयोग करून घेतला.

आठ तास सायकल चालवून सुद्धा नितीन अतिशय फ्रेश होता. ‘आत्ता या हॉल मध्ये बसलेल्या लोकांमध्ये सर्वात फ्रेश तुम्ही दिसता आहात’, असे दत्ताने त्याचे कौतुक केले.

आम्हाला सर्वांना प्रेरणा देऊन पुढच्या कार्यक्रमासाठी तो सायकल वरूनच उत्साहात रवाना झाला.