रवी दामले

आमचे मुक्तांगण मित्र रवी दामले यांचा आज वाढदिवस. आज ते बहात्तर वर्षाचे आहेत हे त्यांच्याकडे बघून खरंच वाटत नाही, इतकी त्यांची तब्येत छान राखली आहे. १९ वर्षांपूर्वी जेव्हा ते मुक्तांगणमध्ये ऍडमिशन साठी आले तेव्हा डायबीटीस आणि ब्लड प्रेशर वाढले होते.

मुक्तांगणच्या पाच आठवड्याच्या उपचारांमध्ये तब्येत  सुधारली. त्यामुळे त्यांना व्यसनमुक्तीचं महत्त्व समजलं आणि गेली १९ वर्ष ते व्यसनमुक्त आहेत. पत्नी आणि मुलांची त्यांना व्यसनमुक्त रहाण्यासाठी छान साथ मिळाली.

दारू बंद झाली तरी त्यांची तंबाखू सुटली नव्हती.

त्यांना तंबाखू सोडायची इच्छा होती. आपण दारू पासून दूर झालोय पण तंबाखूची गुलामी आहे आणि ती पण घातक आहे हे पटूनही हे व्यसन सुटत नव्हतं.

नंतर मात्र त्यांनी हे व्यसन सोडायचं फारच मनावर घेतलं.

तंबाखू सोडण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं हे त्यांनी मला लिहूनच पाठवलं-

“मी नेमकं काय केलं?

  • कागदावर लिहून काढलं की मी सुशिक्षित असूनही मी रस्त्यावर थुंकतो.
  • रोज ब्रश करताना दात आणि जिभेचा झालेला ऱ्हास बघायचो.
  • आता मी आयुष्यभर तंबाखू सोडली असा मोठा निश्चय करण्यापेक्षा छोटा निश्चय केला ‘फक्त आत्ता नको’ – one moment at a time . इच्छा झाली तर आत्ता नको नंतर खाऊ असं स्वतःला सांगायचो.
  • रोज मनाला प्रार्थनेच्या माध्यमातून समज द्यायचो की मला तंबाखू खायची नाहीये,खायची नाहीये. पुन्हा पुन्हा हे स्वतःला सांगायचो.
  • तंबाखू ऐवजी काही दिवस लवंग चघळली
  • अल्कोहोलिक ॲनॉनिमस, मुक्तांगणच्या फॉलोअप मीटिंग किंवा माझ्या कामाच्या मीटिंग मध्ये तंबाखू तोंडात ठेवून बसायचं नाही. मीटिंग मधून उठून तंबाखू खायची नाही, असं ठरवलं आणि त्याचं पालन केलं.

या सर्व गोष्टी हळूहळू जमायला लागल्या.

“मला वाटतं की मी दीड वर्ष माझ्या मेंदूला मला तंबाखू खायची नाही असं ट्रेन करत होतो. कुठेतरी ते रजिस्टर झालं असावं. कारण २३ऑगस्ट २००६ पासून खायची इच्छाच झाली नाही.पुढे भीतीने २ महिने पुडी खिशात असायची पण खाल्ली नाही.”

असे हे आमचे दामले काका. एखादा रुग्ण उपचार घ्यायला तयार नसेल तर ते त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी बोलतात. त्याला उपचारासाठी तयार करतात. मुक्तांगण मधून डिस्चार्ज झाल्यानंतरही त्याला व्यसनमुक्त राहण्याची मदत करतात. कित्येक रुग्णांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे.

मुक्तांगणमध्ये ते नियमित येतात.रुग्णमित्रांना स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन करतात. कोणी विद्यार्थी आले असतील त्यांच्याशी संवाद साधतात.

हसतमुख, शांत स्वभावाचे दामले काका मुक्तांगण परिवारातील सर्वांना अतिशय प्रिय आहेत.