लाकूड कोरताना

– अनिल अवचट

माझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं.